मज राहवले नाही
मज राहवले नाही
आक्रोशाच्या रुदनानी
मृत्यू तांडव पाहूनी
हंबरडे आवेगानी
मज राहवले नाही
काय अपराध त्यांचा
बळी रोगाने घेतला
सारी कुटुंबे उध्वस्त
मम जीव थरारला
दुःख ठाकले पुढ्यात
सीमा गाठली रुदनी
शांत करावे तयांसी
इच्छा उसळे मन्मनी
आवरुनी शोकावेगा
दिले पाणी प्रेमभरे
थोपटुनी आयाबाया
दुःख बळेच आवरे
शोकावर्त होई शांत
परि जेवण घेईना
मन आठवणीतळी
बुडे कल्लोळात पुन्हा
असे कसे कोरोनाने
क्रूरपणे संहारले
केले होत्याचे नव्हते
नच स्वप्नीही कल्पिले
