मी आत्महत्या नाही करणार
मी आत्महत्या नाही करणार


येऊ दे अवकाळी पाऊस
होऊ दे माझ्या शेतीची नासाडी,
कष्टाने राबवलेल्या या काळ्या मातीची
होऊ दे दुष्काळामुळे बिघाडी...
जमीन फाटलेय, पाऊस रुसलाय
सावकाराचं कर्ज वाढलंय जीव तुटत चाललाय,
बायका-पोरं अन्नासाठी तडफडतायत
गुरं-ढोरं दावणीलाच अडकतायत...
परवा सदाचा बैल पाणी नाही
म्हणून तडफडून मेला,
आणि तात्याचा बबन्या
कर्ज वाढलं म्हणून आत्महत्या करून गेला...
कधी कधी हे सगळं पाहून
मनात जीव द्यायचा विचार येतोय,
पण मी गेल्यावर बायको-पोरांचं गुरा-ढोरांचं काय
याच विचारातून त्यांच्याचसाठी जगतोय...
चाललेत माझे बंधू धरणी मातेला सोडून
कुणी विहिरीत उडी मारून तर कुणी गळफास घेऊन,
पण मी माझ्या आईला असं एकटं नाही सोडणार
दुष्काळाशी लढणार आणि शेतात सोनं नक्की पिकवणार
वचन देतो तुम्हाला
पण मी आत्महत्या नाही करणार...
मी आत्महत्या नाही करणार...