मापदंड..
मापदंड..
व्यक्त होण्याचे ज्याचे त्याचे
मापदंड ठरलेले आहेत
अन्यायाविरुद्ध बंड करताना
सुद्धा माणसे कविता करतात
अन्यायाला, दु:खाला सुद्धा
शब्दांनी सजवलं जातं, मढवलं जातं
दुःखाचे चित्रीकरण करायचे,
त्याला गडद रंग देऊन ऑस्कर मिळवायचं
दुःखाचे चित्रकरण व
ते व्हायरल करायचे
व श्रेय घ्यायचे
दुःखाच्या गाण्यांनीच प्रेम अजरामर झालय
व्यक्त होण्यातून माणसें
स्वतःची किंमत ठरवतात.
कुठे ,किती, कसं, कां,
केंव्हा व्यक्त व्हायचं
कळायला लागल्यापासून
माणसे अव्यक्त राहणेच पसंत करतात.
अव्यक्त राहणंही झाकली मुठअसते.
व्यक्त होण्याचे ही आता
अधिकृत ठेकेदार आहेत
व्यक्त होण्यावर ही आता
सेन्सॉरशीप आहे
समोरचा पाहून
सावधगिरीने माणसे व्यक्त होतात
मोजून-मापून व्यक्त झाले
की प्रश्नच निर्माण होत नाहीत
सगळे प्रश्न व्यक्त न होण्याचेच.
