मानव जीवन
मानव जीवन
योनी चौऱ्यांशी भोगून
भेटे मानवाचा तन |
कर्म चांगले करून
भोगा आनंदी जीवन ||१||
आहे मानव जीवन
जगी खूप मूल्यवान |
करा चांगले कर्तव्य
मनी ठेऊनिया जाण ||२||
नीती प्रेम सद्भावना
त्याग नि परोपकार |
सेवा सहनशीलता
मनुष्याचे अलंकार ||३||
अर्थार्जन मोहापाई
विसरला तू सद्गुण |
अनैतिक कृत्यामुळे
आले तुला अवगुण ||४||
तुझ्या अवगुणांमुळे
सारा बिघडला तोल |
स्वतःचीच किंमत तू
केली आहे मातीमोल ||५||
कृत्य वाईट करूनी
नको ओढू बदनामी |
नको विसरू, वरून
पाही तुला अंतर्यामी ||६||
आतातरी तू सांभाळ
सोड दंभ द्वेष भाव |
कर असे कर्म जगी
मेल्यावर राही नाव ||७||
जपण्यास नीतीमुल्ये
कर सत्संग भजन |
वाच चांगली पुस्तके
सत्कारणी होई मन ||८||
