माझा सखा माझा सोबती
माझा सखा माझा सोबती
होता अंधकार सर्वत्र वाट एकटीच होती चालताना एकटेच साथ कुणाची नव्हती
अशात तुझे येणे झाले शुभ्र सहवास तुझा
मन चांदण्यात न्हाले अन् सोबत तुझ्या जीवन सुंदर झाले
माझ्या सुखात सहभागी होणारा
माझं दुःख आपला मानणारा
सावली सारखा सतत माझ्याबरोबर राहणारा
माझा सखा माझा सोबती
माझ्या यशासाठी झुरणारा
अपयश आले तर
माझं सांत्वन करणारा
मला आनंदात साथ देणारा
संकटात नेहमी हात देणारा
माझा सखा माझा सोबती
गालातल्या गालात हसणारा
भरलेच जर डोळे कधी तर
ओघळणाऱ्या आसवांना पुसणारा
पैलतीरी साद घालणारा
शब्दांना कानात साठवून गोड प्रतिसाद देणारा
माझा सखा माझा सोबती
मला चांदण्यांच्या बरोबर नेणारा
अंधारलेल्या वाटेत
माझ्या सोबत येणारा
स्वतःच्या हृदयात घरातील सगळ्यांना निर्विवाद स्थान देणारा
दिलखुलास सगळ्यांना हसवणारा
काही न बोलता बरंच काही समजून घेणारा
माझा सखा माझा सोबती
माझ्यासोबत लपंडाव खेळणारा
पटकन सापडली नाही की... कावर- बावर होणारा
सगळ्यांसोबत मन मोकळं बोलणारा आणि भरून आलं मन की मनसोक्त रडणारा
माझा सखा माझा सोबती
माझा प्रत्येक शब्द अगदी सहजपणे जपणारा
खळखळून हसणं तुझं खरंच वाटतं झकास
असा मला सांगणारा
पती-पत्नी हे एक सुंदर नातं प्रेमाने जोपासणारा तळहाताच्या फोडासारखं या नात्याला हळुवारपणे जपणारा
तुटणारा तारा बघणारा स्वतःसाठी काहीच नाही पण माझ्यासाठी खूप सुख आणि आनंद मागणारा
असा माझा सखा माझा सोबती
नेहमी माझ्या मनात रमणारा
पलीकडील किनार्यावरून माझी नेहमी वाट पाहणारा

