माझा भारत महान
माझा भारत महान
कर्तव्याची ठेव जाण तू हक्कासाठी नकोस भांडू
काय केले देशासाठी,चल कार्याचा हिशेब मांडू।।धृ।।
ठेवली का स्वच्छता ;टाकला उघड्यावर कचरा
सांडपाण्याची करूनी सोय, घाणीचा योग्य निचरा
थेंबथेंब जपूनी जल नकोच निष्कारण सांडू
काय केले देशासाठी चल कार्याचा हिशेब मांडू।।१।।
केला का त्याग बांधवांसाठी,रक्षिलेस भगिनींना
परस्त्रीला माय मानुनी पुजलेस का चरणांना
शिवबाच्या स्वराज्याचा वैचारिक मुलमंत्र कांडू
काय केले देशासाठी, चल कार्याचा हिशेब मांडू।।२।।
माझा भारत महान म्हणुनी होईन का महान
प्रगतीसाठी देशाच्या काम करू हरपुनी भान
तंत्रज्ञानाची कास धरूनी, अंधश्रद्धेवरी भांडू
काय केले देशासाठी चल कार्याचा हिशेब मांडू।।३।।
संकटकाळी सुसज्ज वाढव मनोबल सैन्याचे
मनामनातून स्फुरावे वादळ जाज्वल्य भक्तीचे
अतिरेकी, दहशतीचे एकदिलाने शीरकांडू
काय केले देशासाठी, चल कार्याचा हिशेब मांडू।।४।।