नवे वर्ष नवा संकल्प
नवे वर्ष नवा संकल्प
नवे वर्ष, नवा संकल्प हो ज्ञानदानाच्या कार्याचा
सावित्रीचा वसा घेऊनी लेकी शिक्षित करण्याचा।।धृ।।
चूल, मूल, लिंगभेद हा जुना पाया तत्वज्ञानाचा
शिक्षित होऊन कन्या बनली आधार कुटुंबाचा
प्रोत्साहन,मदतीसाठी हात तत्पर ठेवायचा
सावित्रीचा वसा घेऊनी लेकी शिक्षित करण्याचा।।१।।
तंत्रज्ञानाची भरारी,किमया डिजिटल क्रांतीची
अवास्तव वापर टाळूनी चिंता वाहू आरोग्याची
मोबाईल व्यसन नको, हा संकल्प नववर्षाचा
सावित्रीचा वसा घेऊनी लेकी शिक्षित करण्याचा।।२।।
रसायनांनी दुषित केले भाज्या फळे नि पिकांला
जैविक द्रव्ये, खते वापर रोगराई टाळण्याला
नवा विचार रूजविण्याचा संकल्प मानवतेचा
सावित्रीचा वसा घेऊनी लेकी शिक्षित करण्याचा।।३।।
नवे वर्ष, नवा संकल्प हा मनी योजावा जिद्दीने
पूर्ण करावया झटावे निर्धार कर्तृत्व सिद्धीने
महामंत्र सार्थ कार्याचा समाजऋण फेडण्याचा
सावित्रीचा वसा घेऊन लेकी शिक्षित करण्याचा।। ४।।