लेक माझी
लेक माझी
लेक माझी मायाळू
आहे जणू सोनपरी
काळजाचा घड माझा
जाते परक्याच्या घरी.!!
सोनपावलांनी आली
बोल बोबडे बोलणे
दोन्ही हात कवटाळी
घाईघाईतच चालणे....!!
छुमछुम पैंजणाचा
नाद येई अंगणात
लेक येता घरी तेव्हा
भरे आनंद मनात.....!!
जीव लाविते मायबापा
लळा लाविते माहेरी
गणगोत शेजारीही
पाठवतात सासरी....!!
जड पावलांनी जाते
जाते लेक दिल्या घरी
तिची आठवण येता
होते वेदनाही उरी ....!!
लेक आधार आधार
जीव सारा ओवाळीते
आठवणी काळजाच्या
सात कप्प्यात ठेवते....!!
