लाॅकडाऊन
लाॅकडाऊन
दीड दिवस, मग अकरा,
लाॅकडाऊन आता एकवीस,
वेळेत आवरला नाही याला,
विसर्जन करणार हा खवीस!
पण चिंता व घाबरण्याने,
होणार का काही इलाज?
वाढत जाणार महामारी,
करून सृष्टीचा नाइलाज!
रोगराईशी झगडा देऊन,
मानव पूर्वीही होता लढला,
ही वेळसुद्धा जाणार मग,
आता का बरं घाबरला?
सामाजिक दुरावा दंड नाही,
दिली आहे संधी एकांताने,
व्यक्ती विकासाचे साधन हे,
‘स्व’कडे जाण्यास ध्यानाने!
नाश आहे सर्वनाश नाही,
अनिश्चिततेचे अस्थायी चरण,
निराशेच्या काळ्या मेघातून,
दिसतो आहे चंदेरी किरण!
विनंती छोटी, कोरोनाला,
मनातील घरात घेऊ नका,
परिवार आणि स्वतःच्या,
जवळ राहा, अंतर देऊ नका!
वेळ सर्वोत्तम उपचारक,
वेळेस वेळ द्या धैर्याने,
साहस आणि करुणेने,
सकाराने आणि निश्चयाने!
