कुठे आहेस आवाज दे
कुठे आहेस आवाज दे


तुझ्याविना रंगहीन मज, इंद्रधनूची कमान
विना तुझ्या सूर्योदयही, भासे अस्तमान
पाहण्यास आता तुजला, आसुसला हा प्राण
सहवासात तुझ्याच मजला, गुंतून जाऊ दे
बहरलेल्या माझ्या फुला, कुठे आहेस आवाज दे
पाऊलवाट आपली रोजची, आज आपल्याविना सुनसान
शोधत तुजला दाहीदिशांना, हिंडतोय मी बेभान
दूर मजहून कोण्या जगी, आहेस तू रममाण
पळभर तुझ्या तनूस मजला, बिलगून जाऊ दे
परतून मजला प्राणप्रिये, कुठे आहेस आवाज दे
गीत माधुर आपल्या दोघांचे, आहे अपूर्ण राहिले
मूर्त अजूनही ना जाहले, जे स्वप्न आपण पाहिले
सांगायचे बाकी बरेच, ओठांवरती राहिले
नयनांतून या स्वप्नं साजिरे, तुझे पाहू दे
अगं माझ्या स्वप्नप्रियतमे, कुठे आहेस आवाज दे
युगायुगांना ना कळले असे गुढ आपले नाते
सात जन्मा मीलन आपले, आधीच ठरले होते
भेट मजला संगम आपला झाला होता जेथे
श्वासात मज तुझ्या सुगंधी हरवून जाऊ दे
हळूच येऊन कानी माझ्या, कुठे आहेस आवाज दे