करुणाष्टके - भाग २
करुणाष्टके - भाग २
जळत ह्रदय माझें जन्म कोट्यानुकोटी ।
मजवरि करुणेचा राघवा पूर लोटीं ॥
तळमळ निववीं रे राम कारुण्यसिंधू ।
षड्रिपुकुळ माझें तोडि याचा समंधू ॥ ६ ॥
तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी ।
शिणत शिणत पोटीं लागली आस तुझी ॥
झडकरि झड घालीं धांव पंचानना रे ।
तुजविण मज नेती जंबुकी वासना रे ॥ ७ ॥
सबळ जनक माझा राम लावण्यकोटी ।
म्हणवुनि मज पोटीं लागली आस मोठी ॥
दिवस गणित बोटीं ठेवूनि प्राण कंठीं ।
अवचट मज भेटी होत घालीन मीठी ॥ ८ ॥
जननिजनकमाया लेंकरूं काय जाणे ।
पय न लगत मूखीं हाणिता वत्स नेणे ॥
जळधरकण आशा लागली चातकासी ।
हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी ॥ ९ ॥
तुजविण मज तैंसे जाहलें देवराया ।
विलग विषमकाळीं तूटली सर्व माया ॥
सकळजनसखा तूं स्वामि आणीक नाहीं ।
वमकवमन जैसें त्यागिलें सर्व कांहीं ॥ १० ॥
