करुणाष्टके - भाग ५
करुणाष्टके - भाग ५
कितेकीं देह त्यागिले तूजलागीं ।
पुढे जाहले संगतीचे विभागी ॥
देहेदु:ख होतांचि वेगीं पळालों ।
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ २१ ॥
किती योगमूर्ती किती पुण्यमूर्ती ।
किती धर्मसंस्थापना अन्नशांती ॥
पस्तावलों कावलों तप्त जालॊं ।
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ २२ ॥
सदा सर्वदा राम सोडूनि कामीं ।
समर्था तुझे दास आम्ही निकामी ॥
बहू स्वार्थबुद्धीनें रे कष्टवीलों ।
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ २३ ॥
नसे भक्ति ना ज्ञान ना ध्यान कांही ।
नसे प्रेम हें राम विश्राम नाहीं ॥
असा दीन अज्ञान मी दास तूझा ।
समर्था जनीं घेतला भार माझा ॥ २४ ॥
उदासीन हे वृत्ति जीवीं धरावी ।
अती आदरें सर्व सेवा करावी ॥
सदा प्रीती लागो तुझे गूण गातां ।
रघूनायका मागणें हेंचि आतां ॥ २५ ॥
