करुणाष्टके - भाग ४
करुणाष्टके - भाग ४
असंख्यात ते भक्त होऊनि गेले ।
तिंहीं साधनांचे बहु कष्ट केले ॥
नव्हे कार्यकर्ता भुमीभार जालों ।
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ १६ ॥
बहू दास ते तापसी तीर्थवासी ।
गिरिकंदरी भेटी नाहीं जनासी ॥
स्थिती ऎकतां थोर विस्मीत झालों ।
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलॊं ॥ १७ ॥
सदा प्रेमराशी तयां भेटलासी ।
तुझ्या दर्शनें स्पर्शनें सौख्यराशी ॥
अहंता मनीं शब्दज्ञाने बुडालों ।
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ १८ ॥
तुझ्या प्रीतीचे दास जन्मास आले ।
असंख्यात ते कीर्ति बोलोनि गेले ॥
बहू धारणा थोर चकीत जालों ।
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ १९ ॥
बहुसाल देवालयें हाटकाचीं |
रसाळ कळा लाघवें नाटकाचीं ॥
पुजा देखितां जाड जीवीं गळालों ।
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ २० ॥
