करु वंदन भिमाला...
करु वंदन भिमाला...


सूर्य उगवला नवा, पहाट झालीया जीवनाची
करु वंदन भीमाला, आली जयंती भिमाची...।।
कोटी जनांचा उद्धार, करण्या भिम जन्माला,
दीन-दलितांचा उद्धार, खरा भिमानेच केला
केले मनुस्मृतीचे दहन, घटना लिहिली देशाची...।।
जन्मून अस्पृश्य जातीत, झाले विद्याविभूषित,
महाज्ञानी नि विद्वान, गेले होऊन विश्वात
अशी जगात महान, दिली शिकवण धम्माची...।।
केले भिमानेच उपकार, झाली अस्पृश्यता दूर,
केले पशूंना माणूस, दिले न्याय, अधिकार,
गोडी चाखाया मिळाली, महाड तळ्याच्या पाण्याची...।।
या समाजोद्धारासाठी, सारे जीवन अर्पिले,
नाही जमले ते कोणाला, कार्य भ
िमानेच केले
केला राम मंदिर प्रवेश, काय हिंमत ती वाघाची...।।
भिम जन्माला म्हणून, आम्ही झालोय माणूस,
वेशीबाहेरचा समाज, आज धरलाय वेश,
भिमामुळेच झाली सारी, प्रगती समाजाची...।।
देऊ जय भीमचा नारा, होऊ समाज एक सारा,
जातीवादाचं महासंकट, वेळीच दूर करा,
बहुजनांनो जोपासा, ही चळवळ भिमाची...।।
घ्या भिमाची शिकवण, शिक्षण, संघर्ष, संघटन,
नाही झालात राज्यकर्ते, सारे जाचाल मिटून,
लई झालीया फुटीरता, आहे गरज एकीची...।।
एकजुटीने नांदा रे, शपथ भिमाची घेऊन,
लई झाले गट, तट, नका जाऊ विभागून,
आहे अजून जिवंत, जात ही मनुवाद्यांची...।।