कन्यादान
कन्यादान
पाहता नाजूक निरागस हास्य तिचे
सवय झाली असते संकटांना विसरण्याची
बोटाला धरून चाललेले इवलेसे हात
नकळत येते जबाबदारी आता कळीला फुलविण्याची
खुप खेळ, गंमती, अंगातील मस्तीचे ते क्षण
राहते बनून एक अविस्मरणीय आठवण
येते वेळ आता तिला दुनियादारी शिकवण्याची
वडिलांचा विश्वास देतो तिच्या पंखांना बळ
त्या क्षितिजाच्या पलीकडे जाण्याची
दुडुदुडु धावणारी तिची नाजूक पावल
आता सप्तपदी चालायला तयार होते
लहानपणी भातकुलीच्या खेळात
संसार मांडणारी आता खरच संसाराला लागणार असते
एक क्षण ही नजरेआड होऊ न वाटणारी
अचानक दुसऱ्याच्या हाती आता सोपवावी लागते
बाबा बाबा करणारी लेक कळत नाही तिला
अचानक ती दुसऱ्याची होते
मेहंदीचा रंग बघून तिच्या
बाबाच मन हळव होत
घर सार सजलेल, चैतन्याने भरलेल असले
तरी रित होण्यापूर्वी उरलेले काही
क्षण तो तिच्या निरागसपणात घालवतो
गोऱ्या गोऱ्या गालाचा रंग मग पिवळा होतो
लेकीला हळद लागतांना पाहून
बाप अधिक हळवा होतो
कितीही धीर, गंभीर असला तरी
त्या क्षणी त्याच्या काळजाला जणू चिरा जातो
तिचा हात दुसऱ्याच्या स्वाधीन करतांना
परत आपल्या लेकीला तो डोळे भरुन पाहतो
अंतरपाट धरीत येतो तो हळवा क्षण
आता त्याची लेक होते परक्याचे धन
त्याच्या जीवाचा विसावा
दिला जातो विश्वासाने दुसऱ्याच्या हाती
आनंदाने उजळतात चार भिंती आणि नाती
पण त्याचे मन बघते त्याला रडतांना
हात ही धरधरून जातात कन्यादान करतांना
पण तरीही तो करतो
हसत हसत आपल्या काळज्याच्या
तुकड्याचे हे दान
काय तर म्हणे, दानांमध्ये सर्वश्रेष्ठ असे हे कन्यादान लाभले हे भाग्य ज्यास तोच खरा भाग्यवान
