खळाळते हासू...
खळाळते हासू...
मोठ्या माझ्या बाबांचे
पुस्तक मोठ्ठं भारी
अरे! पुस्तकातील चित्रं
हरवलीत कुठे सारी
यात नाही काऊ
यात नाही चिऊ
चोरुन दूध पिणारी
गेली कुठे म्याऊ
फक्त काळी अक्षरं
चालती घाई घाई
इटुकली पिटुकली
दिसेना खारुताई
रंगीत रंगीत छान फुले
नाहीत हिरवी झाडी
झुक झुक करणारी
दिसेना आगीनगाडी
वाटले झाडाच्या सावलीत
बाकड्यावर मजेत बसू
गप्पा मारु साऱ्यांशी
अन् खूप खूप हसू
इटुकली पिटुकली
माझी पुस्तकं भारी
त्यातील छान चित्रं
गप्पा मारती सारी
नको बाबा नको
मोठ्ठे पुस्तक तुमचे
खळाळते हासू
हरवेल ज्याने आमचे
