कान्हा ( गवळण )
कान्हा ( गवळण )
यशोदेचा कान्हा ,कुठे गेला हरी
शोधून थकले,आले बाई घरी||धृ||
रात्रंदिन लागे, तुझाच रे ध्यास
कधी भेटशील, सख्या तुझी आस
कासावीस जीव,होतो माझ्या उरी
शोधून थकले,आले बाई घरी||१||
मन मंदिरात,असे तुझी मूर्ती
राधाकृष्ण सखा,जगामध्ये किर्ती
नको ठेवू कान्हा,मजसी रे दूरी
शोधून थकले,आले बाई घरी||२||
येई प्राण कंठा,किती वाट पाहू
तुझ्या प्रेमरंगी, रंगून मी जाऊ
अंतकाळी कान्हा, धाव रे सत्वरी
शोधून थकले,आले बाई घरी||३||