धुक्यातील पायवाट
धुक्यातील पायवाट


जीवनाच्या त्या समरामध्ये गेलो मी कावून
धनप्रतिष्ठेच्या लोभापोटी ऊर फुटेस्तोवर धावून
माणसांच्या या समूहांमध्ये वाटे मी एकटा
केवळ धनसंपत्ती का ठरवे कोण मोठा अन् कोण धाकटा?
अपयशाच्या मागून गेले सारे आप्तजनही दूर
वाटे जीवनामधील सारा हरवून गेला सूर
अन् सुखाच्या आशेपोटी झालो मी उदास
वाटे कोठे हरवून गेले ते माझे निर्मळ हास्य?
आम्रवृक्षावरील कोकिळेची कधी ऐकली साद?
अन् कसा विसरलो पावसातल्या गारांचा स्वाद?
कधी निरीखिली नभातील ती बगळ्यांची माळ?
अन् कधी हरखलो ,विस्मित झालो पाहुनी इंद्रधनूची कमान?
का धावलो,दमूनि बसलो सुखाच्या लालसेपोटी?
वेड्या बघ ही सृष्टी खुणवी , आनंद किती हा भोवती
निसर्ग घाली साद आपुले पसरुनि बाहू
कवटाळीत मजला म्हणतो ,आधी डोळे पूस पाहू
येथे सारे समान जरी का असो रंक वा राव
बाळा येथे कधी ना आढळे असा दुजा भाव
दंभ वैर वा मत्सर यांना नाही इथे थारा
येथे केवळ नीरव शांतता आणि झुळझुळणारा वारा
सृष्टीचे विभ्रम निरखिण्या कितीही काळ थांब
आनंदाचे क्षण वेचण्या येथे न लागे दाम
धावू नको अन् दमू नको वृथा मायावी सुखाच्या पाठी
ऐकलेस का कधी शमते तृष्णा मृगजळाकाठी?
कधी तुला जर आठव आला,निःशंकपणे ये परतून
माझ्यासंगे जाशील सारी दुःखे विसरून
प्रश्नांची उकलेल गाठ जर बसशील या एकांती
मग मिळेल तुजला येथेच अपूर्व अशी शांती
निसर्गाची साद ऐकूनी हर्षलो मनी काठोकाठ
अन् दिसे माझीच मजला दाट धुक्यातील पायवाट
दाट धुक्यातील पायवाट