काल - गती
काल - गती
काल - गती
घटका जाती, पळे जाती, काळ वाहतो वेगाने।
समयावरी का विजय मिळवला, आजवरी कुणी राजाने॥
धन - संपत्ती, आरोग्य - प्राप्ती, मिळवणे, मनुजा तुज हाती।
धावशील जरी, कष्टशील किती, परी ' काळ ' कुठून येईल गाठी?॥
' काळ ' न येईल हाती फिरुनी, एकवार जो निसटून गेला।
शोधीत त्याला फिरशील वणवण, तरी तुझा कार्यभाग संपला॥
साधायाची असेल तुजला, जर त्या काळाची गती।
मुठीत तुझिया बांधून ठेव, तू कालचक्र सांप्रती॥
नकोस कधीही थांबून राहू, म्हणू नको, " उद्या करीन काम "।
' उद्या ' कधीही न येईल बाळा, न विकत घेई त्या ' दाम '॥
जो कल्पितो चित्र उद्याचे, समयाच्याही पुढचे।
प्रत्यक्षामध्ये उतरवून त्यामध्ये रंग भरी जो कृतीचे॥
तोचि सिकंदर, तो बलवत्तर, काळ धरी जो हाती।
मुठीत त्याच्या येईल विश्व हे, जग जिंकील तो नृपती॥
नका दवडू हा ' समय ' वाया, नको फुका ' काळ ' जाया।
मुठीत तुमच्या भाग्य बांधून, व्हा सिद्ध राज्य कराया॥
