जोडीदार
जोडीदार
मृग नक्षत्राच्या सरीनं ओला झालेला मातीचा
पापुद्रा फुलावा अन् क्षणात आसुरलेल ते रान
कस्तुरीच्या सुगंधापरी बहरून जाव
असा आयुष्यात तो यावा
त्याच्या सोबतीने आयुष्याला अर्थ मिळावा
त्याच्या सोबतचा प्रत्येक क्षणामध्ये प्रेमाचा
नवा अर्थ उलगडत जावा
असा जोडीदार असावा..!
प्रत्येक गोष्ट मान्य केली पाहिजे असे नाही
ऐकून मात्र घेणारा थोडं कधी प्राधान्य
आपल्या मतांना देणारा असा जोडीदार असावा..!
थोडासा हळवा, थोडासा चिडका
मनामध्ये त्याचा गोडवा असावा
रूपावर नाही तर आपल्या स्वभावावर
जीवापाड प्रेम करणारा
असा जोडीदार असावा..!
वागण्या -बोलण्यातून त्याच्या आपल्या
प्रती काळजीचा सूर कळावा
समजून घेणारा, समजून सांगणारा
अन् बोलण्यात त्याचा आदर दिसावा
असा जोडीदार असावा..!
नात्यांना हळूवारपणे जपणारा
सुखदुःखात साथ देणारा
सावली सारखा सतत बरोबर राहणारा
आपल्या यशासाठी झुरणारा
अपयश आल तर धीर देणारा
असा जोडीदार असावा..!
शब्दात नाही सांगता आले
तर डोळ्यातून समजून घेणारा
चुकले कधी तर हक्काने सांगणारा
नाजूक भावना मनीच्या अलगदपणे जपणारा
असा जोडीदार असावा..!
क्षितिजावरवरील इंद्रधनूसारखी
रंगाची उधळण करणारा
सुख-दुःखाचे रंग सारे आयुष्यात भरणारा
"मी" आहे सदैव तुझ्यासोबत हा विश्वास देणारा
असा जोडीदार असावा..!

