जन्म एका कवितेचा
जन्म एका कवितेचा
माझ्या गर्भार मनात
तुझ्या विचारांचे बीज
कसं रुजलं
माझ्याही नकळत
कळलंच नाही ..
तुझा अंकुर वाढत होता क्षणक्षणाला ..
कित्येक भाव भावनांचे कढ पचवून..
नवनवीन सृजनात्मक कल्पनांचे
लागले होतेे मला डोहाळे ..
सारी सृष्टी पुरवित होती जणू
तुझ्या कोड कौतुकाचे सोहळे..
कधी साहित्यिकांच्या मांदियाळीत..
यथेश्च वैचारिक भोजनाचे..
कधी गीतांमध्ये
स्वर्गीय संगीतात..
चिंबचिंब भिजण्याचे..
कधी सुता वरून
स्वर्ग गाठण्याचे..
कधी अनिमिष नेत्रांनी
निसर्ग सौंदर्य
आकंठ प्राशण्याचे..
क्षणाक्षणाला वाढत होती
उत्कंठा तुझ्या जन्माची..
तो नाजुक क्षण जवळ आला
तशी थोपवूच शकले नाही
ह्या प्रासंगिक वैचारिक कळा..
प्रसव पीडाअसह्य होऊन..
कैक वेदनांच्या गराड्यात...
झालाय तुझा जन्म
आत्ता कुठेशी..
तुझी गोंडस चर्या पाहून
प्रत्येकानं त्याच्या आवडी प्रमाणं..
केले तुझे नामकरण ..
मग माझ्या वेदनांचे काय ?
मी मात्र तुला
कविताच म्हणणार..
थाटामाटात तुझं
बारसं करणार ..
माझं मन तु अगदीच
हलकं हलकं केलंय..
एक तेजस्वी
बाळ जन्मलंय..
तुझ्या सारखं ..
माझ्या वहीत
काव्य रुपाने
रडत रडतच..
मी आहे सज्ज
स्वागता आसुसलेली
तुला कवेत घेण्यासाठी
अशक्त तरी हसत हसतच
गोजिऱ्या बाळाला पाहून ..
मातृत्व सुखाने
नुकताच पान्हा फुटलेल्या
मातेसमान.. तृप्त
साऱ्या प्रसव पीडा
व्यथा अन् वेदना विसरून...!
