जगावं थोड स्वतःसाठी...
जगावं थोड स्वतःसाठी...
धावपळ आयुष्यभर आपली
असते आपल्यांना जपण्यासाठी
सोबतीने त्यांच्या जगता जगता
आपणही जगावं थोडं स्वतःसाठी...
करावं प्रेम सर्वांवरच आपण
द्यावा ओतून जीव आपल्यांवरती
सर्वांवर प्रेम इथल्या करता करता
आपणही द्यावं प्रेम थोडं स्वतःसाठी...
वाद तर होतच असतात
असावा संयम तो वाद टाळण्यासाठी
सर्वांबरोबरचा वाद टाळता टाळता
आपणही शांत व्हावं थोडं स्वतःसाठी...
वाट आयुष्याची चालताना
येतात अडचणी मार्ग अडवण्यासाठी
आयुष्याचा तो मार्ग चालता चालता
आपणही मार्गदर्शक व्हावं थोडं स्वतःसाठी...
आयुष्य हे असचं असतं
स्वतःबरोबरच इतरांनाही जपण्यासाठी
आपल्यांना इथल्या जपता जपता
आपणही जपावं स्वतःला थोडं स्वतःसाठी...
