जेव्हा सारे जग ठप्प होते
जेव्हा सारे जग ठप्प होते
लॉक डाऊनचा सहावा दिवस३० मार्च २०२०
प्रिय रोजनिशी,
चीनमध्ये "वुहान "मध्ये करोना नावाचा रोग पसरलाय हे ऐकून होतो, पण इतक्या लवकर तो भारतात येऊन संपूर्ण भारतावर चढाई करेल असे काही वाटले नव्हते. पण आज ते झाले, त्यामुळे सर्व हॉस्पिटल्सचा चेहरामोहरा बदललेला आहे. हॉस्पिटलमधील सर्व मंडळी मास्क, कॅप, गाऊन घालून फिरतात. अजून तरी आमची ओ पी डी चालू आहे. अजूनही या विभागातील रुग्णांना परिस्थितीचे गांभीर्य आलेले नाही .मालवणी विभाग मुस्लिम बहुल आहे लोक बिंदास ट्रिपल सीट घेऊन फिरतात येथे पण सिक्युरिटी ला रुग्णांच्या रांगा लावताना दमछाक होते लोकांना सतत ओरडून-ओरडून अंतर ठेवा अंतर ठेवा सांगावे लागते इतकच काय गरोदर स्त्रियादेखील घरात बसलेल्या नाहीत त्या तपासणीसाठी आल्या मग त्यांना समजवावे लागले तुम्ही आता बाहेर फिरू नका जेव्हा काही त्रास सुरू होईल तेव्हा एकदम डीलेव्हरीला या! तरीही काही जणी ऐकतच नाही त्यांना तपासणी करूनच हवी असते.
आम्ही सकाळी रुग्ण येण्याआधी आणि दुपारी रूग्ण येऊन गेल्यानंतर हायपोक्लोराइड लोशन ने संपूर्ण रेलिंग ,बेंचेस, टेबल-खुर्च्या व सर्व एरिया फवारणी करून घेतो. सतत लोकांना हात धुण्या बाबत सहा स्टेप चे प्रॅक्टिकल सांगत असतो.
आम्ही स्वतः देखील कुठे हात लागला की लगेच हात धुतो. याआधी आपल्याकडे जेवणापूर्वी ,बाहेरून आल्यानंतर ,शौचास जाऊन आल्यानंतर हात धुण्याची पद्धत होती. पण आता कोरोना मुळे अजूनच जागरूक झालो. बाकी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक धास्ती दिसते. एक भीतीचे सावट दिसते. कोणताही सर्दी खोकल्याचा पेशंट आला ही लोकांना तो कोरोनाबाधीत तर नसेल ना असे वाटते
बस स्टॉपवरदेखील साधे शिंकलो किंवा खोकलो तरी लोक दहा मीटर लांब पळतात.
