*शुभमंगल सावधान*
*शुभमंगल सावधान*
सोयर्याधायर्यात भावभावकीत तुझं होतयं म्हण, हसू
मुलीचं लग्न कर लवकर तीला शिकवत नको बसू
हुंडा देऊन मुलीला घराबाहेर काढ !!1!!
वाढ भाऊ वाढ वाढ बुंदी वाढ
लग्न व्हावं देखण सतराशे पुढारी अठ्ठराशे फेटे
वरपक्षाने म्हटले पाहीजे आम्हाला पाहूणे भेटले मोठे
म्हणून बिन ओळखी लोकांनाही मुळपत्रिका धाडं !!2!!
वाढ भाऊ वाढ वाढ बुंदी वाढ
सामुहीक विवाह सोहळ्यात इज्जत होईल कमी
थाटात लग्न नाही केले नाराज होईल नवदेवाची मम्मी
खोट्या प्रतिष्ठेसाठी त्यांचे करायचे फाजिल लाड !!३!!
वाढ भाऊ वाढ वाढ बुंदी वाढ
वाजंत्री ,जेवण,मांडवाव दंग व्हावी भावकी
पैशाच्या उधळपट्टीवर भाऊ खूश व्हावी गावकी.
दोन एक्कर जमिन बेभाव विकायला काढ.!!4!!
वाढ भाऊ वाढ वाढ बुंदी वाढ.
बसवं नवरदेव घोड्यावर तुला असूदे फाटका जोडा
रूखवताने भरला पाहीजे ईवायाचा वाडा
सवईने नाही भेटल्यास शेकडेवारीने काढ!!5!!
वाढ भाऊ वाढ वाढ बुंदी वाढ.
साधसुधं नको कापडं घे भरजरीचा आहेर
वरपक्षाने म्हणावे लयभारी सुनबाईचे माहेर
भपकेबाज लग्नासाठी होऊदे कर्जाचा पहाड!!6!!
वाढ भाऊ वाढ वाढ बुंदी वाढ.
शेती तर पिकत नाही पिकलं तर विकत नाही
लग्नासाठी काढलेले कर्ज
मेल्यानंतरही चुकत नाही.घे दोरी हातात भाऊ
तुझी वाटं पहातंय शेतात भलमोठं झाडं!!7!!
वाढ भाऊ वाढ वाढ बुंदी वाढ.
