हसून पाहिलेस तू
हसून पाहिलेस तू
हसून पाहिलेस तू क्षणात जीव गुंतला
कळेचना कधी कसा तुझ्यात जीव गुंतला
कितीक लोक शाहणे असेल भेटले तुला
म्हणे सखे कसा तुझा खुळ्यात जीव गुंतला
असून सोबतीस सावली कधी न भावली
मनास जाळतो तरी उन्हात जीव गुंतला
कधीतरी इथेच सोडुनी निघून जायचे
किती जरी असेल या जगात जीव गुंतला
मकरंद फक्त शोषण्या हवा तुला फुलातला
कधी न भोवर्या तुझा फुलात जीव गुंतला
उगाच सोडले न एकटीस तू असे मला
खरेच सांग ना तुझा कुणात जीव गुंतला?
तुझाच भास सारखा नि आठवण सदा तुझी
करेल काय जीव..? जर जिवात जीव गुंतला!
