हल्ली हल्लीच समजलं
हल्ली हल्लीच समजलं
शांत, थंड वाऱ्याची झुळूक,
वहात असते बाहेर...
धुमसत असतो कधीकधी,
तेव्हाच लाव्हा आतल्या आत.
हे धुमसणं असं की त्या,
थंडगार प्रवाहानेही माघार घ्यावी.
अशावेळी उपयोगी पडतातही,
कोणाचे आश्वस्त शब्द वा स्पर्श...
पण तरीही काही कमी जाणवत राहतेच...
कसली कमी ते समजलं हल्ली हल्लीच.
गडबड, गोंधळ, आवाज,
गर्दी असते बाहेर...
वाटत असतो कधीकधी,
तेव्हाच एकटेपणा मनातल्या मनात.
हे एकटेपण असं की त्या,
गडबड, गोंधळानेही निःशब्द व्हावे.
अशावेळी उपयोगी पडतेही,
कोणाची धीर देणारी सोबत...
पण तरीही काही कमी जाणवत राहतेच...
कसली कमी ते समजलं हल्ली हल्लीच.
शुष्क, कोरडा रखरखाट,
जाळत असतो बाहेर...
वहात असतात कधीकधी,
तेव्हाच गंगाजमुना डोळ्यात.
हे वाहणं असं की त्या,
शुष्कपणानेही चिंब व्हावे.
अशावेळी उपयोगी पडतेही,
डोळ्यांची भाषा जाणणारी एक शांत नजर.
पण तरीही काही कमी जाणवत राहतेच...
कसली कमी ते समजलं हल्ली हल्लीच.
समजलं हे हल्ली हल्लीच की,
ते शब्द वा स्पर्श...
ती धीरोदात्त सोबत...
ती शांत नजर...
कुठवर साथ देणार आपल्याला?
एक उंबरा असणारच ना
त्यांची वाट अडवायला.
हा उंबरा ओलांडून पुढे जाताना...
सोबत कोणी नसले जरी...
तरी आपल्यातली ऊर्जा,
असणारच कायम आपल्याबरोबर.
जागवायला हवंच त्या ऊर्जेला...
आणि चालायला हवं काळाबरोबर...
हल्ली हल्लीच समजलं.
