STORYMIRROR

Shanti Gurav

Inspirational

4  

Shanti Gurav

Inspirational

हीच आमुची प्रार्थना

हीच आमुची प्रार्थना

1 min
473

हीच आमुची प्रार्थना, हेच प्रेमाचे मागणे

नको दुष्टावा, द्वेषाची दूषणे

देऊ घेऊ एकमेकांना प्रेमाचे, स्नेहाचे नजराणे.


   हीच आमुची प्रार्थना, हेच ज्ञानाचे मागणे

   दूर होवोत अंधकार, अज्ञानाची भस्म व्हावीत दालने

   ज्ञानाच्या असंख्य ज्योतीने उजळत राहोत मने.


हीच आमची प्रार्थना, हेच एकतेचे मागणे

सदा एकजुटीने असावे राहणे आमचे निश्चिंतपणे

विविधतेत एकतेचे मिळून गावे गाणे.


   हीच आमची प्रार्थना, हेच माणुसकीचे मागणे

   दुराव्याचे नकोत कोणतेच बहाणे

   मानवतेच्या सवे छेडित राहावे बंधुप्रेमाचे तराणे.


हीच आमची प्रार्थना, हेच शांततेचे मागणे

अशांत, अस्वस्थ, युद्धमय ढगांना दूर पांगवणे

शांतमय जीवनाचे फुलावे सर्वत्र चांदणे.


    हीच आमुची प्रार्थना, हेच आशेचे मागणे

    निराशेच्या धुक्यातून स्वतःला सावरणे

    पडावे प्रत्येक पाऊल पुढे प्रगाढ विश्वासाने.


हीच आमुची प्रार्थना, हेच प्रगतीचे मागणे

नकोत विध्वंस, निसर्ग कोप, अवर्षणे

व्हावे जीवन समृद्ध निसर्गाच्या वरदानाने.


   हीच आमची प्रार्थना, हेच सौख्याचे मागणे

   दुःख, संकटे, नैसर्गिक आपत्ती नकोत येणे

   सदा असो सुखाचे वास्तव्य घरोघरी घालतो हेच गाऱ्हाणे.


हीच आमुची प्रार्थना, हेच प्रत्येक भारतीयांचे मागणे

बंधुभाव, ऐक्य, परंपरेचे पाईक होऊन जगणे

एकच स्वप्न सर्वांचे, सूर्य बनून विश्वात तळपणे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational