गौराई
गौराई
लेक लाडकी लाडकी
आली माहेरी गौराई..
साडी चोळी मानवून..
करू गं सरबराई..!!
आई गौराई गणाची
बसे गणाच्या शेजारी..
संगे शिव चंद्रमोळी
करु पुजेची तयारी..!!
झिम्मा फुगडीच्या संगे
रात्र उत्साही जागेल..
आगमनाचा सोहळा
माझ्या अंगणी रंगेल..!!
पाहुणचार घेऊन
गणासवे ती जाईल..
माहेराचा दरवळ
नित्य हृदयी राहील..!!
जशी गौराई पुजता
तशी पूज्य लेक जाणा..
खुडू नका उदरात
तिला खेळू द्या अंगणा..!!
