एका पुरग्रस्ताची आत्मकथा
एका पुरग्रस्ताची आत्मकथा
काय गेलंय वाहून साहेब काय सांगू शब्दात,
दोन पिल्लं खेळत होती काल माझ्या अंगणात...
झोपडीत होता म्हातारा खोकल्यासकट गेला,
म्हातारी कुंकू पुसून म्हणते अजून नाही मेला...
पूर गावातच नव्हता साहेब घरात राहून गेलाय,
गाई, म्हशी आणि पाडसांसंगं कासरासुद्धा नेलाय...
नुसतीच केलती पेरणी बघा बियाणे उसनं आणून,
उगवले की लगेच फेडतो पाया पडून सांगून...
उगवलेलं बुडून गेलं अन् न उगवलेलं कुजून,
उघडल्यावर परत पेरीन हरलो नाही अजून...
अंबाबाई ज्योतिराया अजून सगळं घे काढून,
'उमेद' आहे माझी लढायची, तू फक्त काळीज दे वाढवून !