एक पक्षी
एक पक्षी
रोज येऊन बसतो एक पक्षी
माझ्या घराच्या खिडकीवर अलीकडे!
पहातो टुकुरटूकुर अनोळखी असल्यासारखं, शीट म्हटलं तरी उडत नाही,
चिकटलेले असतात त्याचे पाय लोखंडी गजांना, आणि उडतो लगेच क्षणार्धात!
झाडावरून एक फेरफटका मारून पून्हा येतो त्याच गजांवर,
शिवत नाही पाण्याला, दाण्यालाही
तेच अनोळखी पाहाणं..
स्तब्ध असतो कित्येक मिनिट पुतळ्यासारखा-
निर्जीव ,
मग कर्कश्श किंकाळी फोडून
भुर्र जातो उडून....
घरभर घुमत रहातात
त्याच्या किंकाळ्यांचे प्रतिध्वनी!
न उष्टावलेलं अन्न पाणी घेऊन,
आर्तता असते काहीतरी हे नक्की!
खिडकीच्या गजांवर चोच घासून
करीत असतो धारदार,
एक दिवस हा नक्की हल्ला करणार,
आपल्या घरावर असं मला सारखं वाटतं!
