एक काळ होता आमचा...
एक काळ होता आमचा...
एक काळ होता आमचा...
घर भरलेले असायचे
ते माणसांनी,
तर गोठा भरलेला असायचा
तो जनावरांनी.
पैशा अडक्याची तर
काहीच कमी नव्हती,
तरीही माणसं
माणुसकी जपत होती.
सोयच नव्हती कोठे
दवापाण्याची,
जखमेवर औषधे होती
झाड-पाल्याची.
ओळख नव्हती कधीच
ती टी व्ही ची,
गाणी ऐकायला मात्र
आवड होती रेडिओची.
संगणक मोबाईलचे
नावही माहीत नव्हते,
सातव्या इयत्तेतही
पाटीवरच लेखन होते.
सोय असायची
तेव्हा ती प्रवासाची,
सायकल बैलगाडी
अथवा घोड्याची.
खुशालीच्या निरोपासाठी
वाट पहायची टपालाची,
अन तार म्हणजेच
वार्ता असायची ती दुःखाची.
