ये ना तू आई
ये ना तू आई
गेलीस जरी तू सोडूनी आम्हां
दिससी ठायी ठायी
ये ना तू आई ऽ आई ऽऽऽ
ये ना तू आई ||धृ||
भास तुझे हे क्षणाक्षणाला
वाटे तुझाच पदरव झाला
सोडूनी जाता आम्हा मुलांना
काळीज द्रवले नाही
ये ना तू आई ऽ आई ऽऽऽ
ये ना तू आई ||१||
वाटे मज तू क्षणात येशील
आम्हा मुलांना कवेत घेशील
तव प्रेमाची आस आम्हाला
ये तू लवलाही
ये ना तू आई ऽ आई ऽऽऽ
ये ना तू आई ||२||
तूच सजविले सुंदर घरकुल
घरकुलाचे झाले गोकुळ
गोकुळातुनी निघूनी गेली
कुठे यशोदा माई
ये ना तू आई ऽ आई ऽऽऽ
ये ना तू आई ||३||
जरीही झालो आम्ही मोठे
तुझ्यापुढे गं सारेच थिटे
मूक रूदनाने वाट पाहते
देवघरातील समई
ये ना तू आई ऽ आई ऽऽऽ
ये ना तू ऽ आई ||४||
