गावगाडा आणि प्रेम
गावगाडा आणि प्रेम
गावगाड्याच्या कोंडवाड्यात
फुलणारं प्रेम
फुलण्यापरिस जास्त
होरपळणारं प्रेम
जातीयतेच्या डंखान
विव्हळणारं प्रेम
रक्ताच्या सड्यासरशी
चिघळणारं प्रेम
मौतीच्या अंधारात
दबा धरुन बसलेल
इभ्रतीच्या भयानं
अर्धवट पोसलेल
एका झलकेसाठी
तीळ तीळ तुटणारं
बोभाट्याच्या इस्तवात
आगीवानी पेटणारं
लायकीच्या पायरीवर
लंगडत चढणारं
एकट्यातच स्वतःपाशी
हुंदकत कुढणारं
लाखभर बुजगावण्यात
पाखरावानी उडणारं
वेशीबाहेर दबकत
अलगद वाढणारं
जितेपणीच मरण
दाखवणारं प्रेम
उभ्या खानदानाच
सरण करणारं प्रेम
डोळं फाडुन बगावा
ह्यो गावगाड्यातला खेळ
ते असतय जिंदगीला
तारण ठेवणारं प्रेम...
