धरती आणि पाऊस...
धरती आणि पाऊस...


सोसाट्याचा वारा सुटला भरूनी आले मेघ...
तापलेल्या धरतीला लागले पावसाचे वेध...||
उन्हाच्या दाहात धरती जळून जात होती...
वारंवार ती पावसाला येण्या विनवत होती... ||
मेघ नि लतेने त्याच्या आगमनाची वर्दी दिली...
पावसाला भेटण्यास धरती व्याकूळ जाहली... ||
अखेरीस तो आला गरजत आणि बरसत...
तिचा विरह त्याला सुद्धा तितकाच होता छळत...!!
त्याला अवचित पाहून ती पूरती भांबावली..!!
घाईघाईत मृदगंधाची कुपीच तिने सांडली..!!
तो मग बराच वेळ असाच बरसत गेला...
धरतीवर प्रेमाचा त्याने मुक्त वर्षाव केला... ||
त्यांचे मिलन
पाहण्या उन्हाने हजेरी लावली...
आनंदून त्याने सप्तरंगांची उधळण केली...!!
रिझवण्या पावसाला तीने हिरवा शालू ल्याला...
विविधरंगी फुलांचा शृंगारही तिने केला... ||
काही महिने अशाच झाल्या तयांच्या भेटीगाठी...
अखेरीस येऊनी ठेपली त्याच्या निरोपाची घडी.. ||
पुन्हा येण्याचा शब्द देऊन तो गेला परतून...
तिचा निरोप घेताना त्याचे डोळे आले भरून.. ||
धरती मग त्याच्या आठवणीत रमून गेली...
पुढच्या वर्षीची स्वप्ने ती मनात रंगवून लागली... ||
सर्वजण गातात यांच्या प्रेमाची मधुर गाणी...
दरवर्षी बहरणारी ही सुंदर प्रेमकहाणी...!!