चुकलेले गणित
चुकलेले गणित
चुकलेले गणित निसर्गाचे
आता सावरायला जमेना
थेंबांऐवजी गारांचा वर्षाव
पीकांना माझ्या सहावेना...
भुईसपाट झालेले शिवार
मजला आता पाहावेना
तळहातावरचे हिरवे स्वप्न
डोळ्याआड काही जाईना..
कधी ओला कधी कोरडा
दुष्काळाची व्यथा सुटेना
अस्मानी सुलतानी संकटे
माझी पाठ काही सोडेना..
वाढत चाललाय प्रसार
कोरोनाही आवरतं घेईना
स्थिरावलेली बाजारपेठ
कुलूपबंद संपता संपेना...
खरेदी नि विक्री मंदावली
कवडीतही माळवं खपेना
काळंभोर झालं सोनं माझं
काय करावं तेच सुचेना...
सरकार दंग राजकारणात
मदतीचाही हात मिळेना
आर्त हाक पोटाची येई
आसवांनी या भुक मिटेना..
काळ्या मातीवरचे प्रेम हे
दोन वेळचं जेवण पुरवेना
शेतकऱ्यांची करूण कथा
का कुणीही इथे ऐकेना..
फासावर लटकूनही आम्ही
समस्यांची उत्तरं सापडेना
चुकलेले गणित नशीबाचे
आता सावरायला जमेना..