चेहरा ( अष्टाक्षरी )
चेहरा ( अष्टाक्षरी )
झुकलेल्या नजरेला
पापण्यांचा स्थिरपणा
निरागस शांतता ही
करी अस्वस्थ या मना
कोरलेल्या भुवया त्या
बिंदी शोभतेय भाळी
धारदार नाका शेंडा
ओठ गुलाब पाकळी
बटा केसांच्या येतात
हळुवार बघ गाली
हनुवटी स्पर्शण्यास
घालमेल त्यांची झाली
भाव नितळ चेहरा
आहे असा चितारला
ओंजळीत वाटे घ्यावा
जणू श्वास थांबलेला