बप्पा
बप्पा
बप्पा, गावोगावी-घरोघरी तुझे
स्वागत होतेय जोडुनी कर;
"गणपती बाप्पा मोरया" जल्लोषाने
सर्वत्र भावभक्तीचा जागर
बप्पा, पण तुझ्या या भक्तीला
केव्हाच वाळवी लागलीय ;
"झिंग झिंग झिंगाट"ची
मस्ती डोक्यात दाटलीय
बप्पा, तुजवरची श्रद्धा झोपलेली
तर विश्वास पेंगतो आहे;
बघ तुझा सच्चा भक्त
दारूच्या नशेत झिंगतो आहे
बप्पा, तुझ्या मुकुटावरचा
रंग केव्हाच उडून गेलाय;
नैतिक मूल्ये - संस्कारांचा
सूर्य क्षितिजावर बुडालाय
बप्पा, येथे केवळ सोशल
मीडियावर कावकाव करणारे कावळे;
"बुद्धीची देवता" म्हणून तूच
उघड यांच्या बुद्धीची कवाडे
बप्पा, ऐकू येईल गजर
तुझा दाही दिशात गुंजलेला;
जाती-धर्माच्या नावाने
अन्याय- अत्याचार माजलेला
बप्पा, भक्ती कशीही असली
तरी सुख-शांतीचा आशिर्वाद दे;
पुढच्या वर्षी येताना सुपाएवढ्या
कानात बोळे घालूनच ये
