भूक
भूक
पाठीच्या ताठ कण्याने मिरवणाऱ्या
निअॅण्डरथल माणसा
रिकाम्या पोटाने शिकविले तुला
कुर्निसात करायला
मोठ्या मेंदूचा गर्व असणाऱ्या
होमोसेपिअन मानवा
भुकेने बनवले तुला लाचार
दरवेशाच्या तालावर नाचणाऱ्या अस्वलासारखा
तू नाचतोस भुकेच्या तालावर
ताजमहालावरची सुंदर नक्षी कोरणारे हात
घडवतात खजुराहोची उत्तानशिल्पे
कशासाठी?
नवाबांना रिझवणाऱ्या पर्दानशीन हसीना असोत की
पॅरिसची शाम रंगीन करण्यासाठी
स्वतःच्या देहाचा व्यापार मांडणाऱ्या ललना
दोघींच्याही मनात असतो एकच सनातन प्रश्न
भुकेचा!
