बदलला ऋतू हा
बदलला ऋतू हा
ओल्या सुगंधी हवेतून आला, सुखवित हा गारवा
बदलला ऋतू हा, बदललेत वारे, बदल वाटतो हा हवा.
सुखाचीच स्वप्ने पडू लागली ती
सुखाचीच आशा नवी
वठल्या मनाला कशी रे कळेना
फुटू लागली पालवी
परतूनी आला फांदीवरी या, पुन्हा पाखरांचा थवा
बदलला ऋतू हा, बदललेत वारे, बदल वाटतो हा हवा.
उमलली फुले ही कशी भावनांची
हळवी पुन्हा पाकळी
हसू लागले मी किती रे दिसांनी
पडली पुन्हा ती खळी
रंगून गेले मी जगण्यात आला कोठून हा गोडवा
बदलला ऋतू हा, बदललेत वारे, बदल वाटतो हा हवा.
रुपेरी क्षणांनी कसा घातला फेर
अन् लागले हे दिवे
अंधार सरला, भय ना कशाचे
निघाले प्रकाशासवे
चमकूनी जातो, माझ्याचसाठी, जणू येऊनी काजवा
बदलला ऋतू हा, बदललेत वारे, बदल वाटतो हा हवा.