बाप
बाप
बाप आधारस्तंभ कुटुंबाचा
कणखर बाणा घर संसाराचा
घराचे घरपण अन् वैभव फक्त
त्यांच्या घरातल्या अस्तित्वाचा.
बाप झाल्यावर येते कर्तव्याची जाण
जिवाचे रान करून पै पैका जमवतो
आपल्या बायको मुलांस सूख,आनंद
देण्यास दिवस रात्र राबत असतो.
शिस्त, करारीपणा त्याचा दिसतो
आईसारखे प्रेम तो दाखवत नसतो
रागिट क्रोधित असला तरी मुलांच्या
इच्छा मात्र पुरवण्यास खपत असतो.
मुलापेक्षा मुलीवर लळा जास्त असतो
रागावलेला तरी मुलीशी बोलतो मवाळ
मुलीच्या लग्नात कर्ज काढून खर्च करतो
तिच्या संसारात आनंदाचा उधळतो गुलाल.
पाठवणीच्या वेळी अश्रू गाळत नसतो
पण आतल्या आत रडत असतो अपार
दगडासारखे काळीज करतो दान करताना
परी पोर सासरी जाताना खचून जातो फार.
बापाचे बापपण कळत नाही कधी जगाला
आयुष्यभर राब राबतो आपल्या संसाराला
मुलांच्या यशात त्याचा वाटा असतो सिंहाचा
मुलांनी अभिमान बाळगावा बापाच्या कार्याला
