बाईजन्म
बाईजन्म
सर्व तुम्ही नर नारी
ऐका बाईच्या जुबानी
आज तुम्हाला सर्वांना
स्त्रीची सांगते कहाणी
विधात्याला एका वेळी
स्वप्न पडले अजब
त्याने निर्मिली हो बाई
झाले त्यावेळी गजब
लेक जन्मली आईची
काय वर्णावी महती
तिच्या वर्णनाला मला
शब्द अपुरे पडती
लेकजन्म झाल्यामुळे
लाभे शांतता जीवाला
तिच्यामुळे तर मिळे
जणू बहीण भावाला
इवलीशी गोड परी
धावे बघा दुडूदुडू
गाल गोबरे फुगवे
हसे बघा खुदूखुदू
तारूण्यात पदार्पण
सुरू रूपाचा सोहळा
दिसे कमनीय बांधा
होई आनंद वेगळा
लग्न लागले थाटात
मिळे संसाराचे सुख
एकांतात गाळे अश्रू
जेव्हा-जेव्हा होई दुःख
मनी वेदना होताच
अंगी बदलले भाव
दिसे बाईच्या डोळ्यांत
सदा स्वप्नांचाच गाव
अशी प्रतिभा पाटील
राष्ट्रपती भारताची
तीने उंचावली मान
जगी भारत देशाची
कष्टातूनी रे स्वतःच्या
घेई गगनी भरारी
बाई कल्पना चावला
करे आकाश सफरी
बाई जन्माचे सार्थक
जेव्हा कुटुंब आनंदे
तिच्या घरातून तेव्हा
स्वर हास्याचा निनादे
बाईजन्म घ्यावा तुम्ही
एक तरी आयुष्यात
जसे आगळे-वेगळे
रंग इंद्रधनुष्यात
मातीतून मी जन्मली
मातीतच मरणार
अवकाश व्यापूनही
एकटीच उरणार
असा आहे स्त्रीचा जन्म
स्त्रीची अशी आहे कथा
बाईसाठी रचिलेली
एका बाईची ही गाथा
