बाबा
बाबा
बाबा.....
तशी तुमची आठवण येत नाही कधी,
फक्त...
जेव्हा सगळं जग आनंदात असत,
अन आई मात्र शांत दिसते,
तेव्हा फक्त तुमची आठवण येते...
जेव्हा तुम्ही नसल्याची जाणीव,
करून देत कुणी,
तेव्हा फक्त तुमची आठवण येते...
जेव्हा उशीर झाल्यावर,
दाराबाहेर फेऱ्या मारताना,
दिसत नाही कुणी,
तेव्हा फक्त तुमची आठवण येते...
जेव्हा कौतुक होत असत आपलं,
पण गर्वाने ऊर भरून येणार,
डोळ्याआड अश्रु लपवणार,
दिसत नाही कुणी,
तेव्हा फक्त तुमची आठवण येते...
जेव्हा दादा सोबत,
लटकी भांडण होतात,
तेव्हा माझ्या बाजूच हक्काच माणूस,
दिसत नाही कुणी,
तेव्हा फक्त तुमची आठवण येते...
स्वतःकडे पैसे नसूनही,
आमच्या गरजा वेळेआधी,
पूर्ण करणार उरत नाही कुणी,
तेव्हा फक्त तुमची आठवण येते...
जेव्हा मी धडपडते,
तेव्हा मला ओरडून स्वताला,
त्रास करून घेणार,
उरत नाही कुणी,
तेव्हा फक्त तुमची आठवण येते...
जेव्हा मी कमावलेली छोटुशी कमाई, आभाळभर करून गर्वान सांगणार,
दिसत नाही कुणी,
तेव्हा फक्त तुमची आठवण येते...
आईच्या आजारपणात,
स्वतः आई बनून,
आम्हाला खाऊ घालणार,
असत नाही कुणी,
तेव्हा फक्त तुमची आठवण येते...
जेव्हा खुप रडु येत,
मी ते अलगद लपवून हि,
सहज ते ओळखणार,
राहत नाही कुणी,
तेव्हा फक्त तुमची आठवण येते...
बस बाकी तुमची,
आठवण नाही येत कधी.....
