अशी मी
अशी मी
अजूनही मला वाटते फुलं नी कळ्या वेचून
छानसा गजरा स्वतः बनवून केसात माळावा
जाई जुई कुंदाची फुले , बकुळीची फुले वेचून
ओंजळीत भरून तो सुगंध मनात साठवून ठेवावा
सुई दोरा घेऊन नाजूक हाताने गजरा बनवावा
सुंदर सुवासाची साथ व त्याचबरोबर छंद जोपासल्याचा आनंद घ्यावा
दिवाळीचा फराळ तयार विकत न घेता
सांजोरी शंकरपाळे बेसनाचे लाडू
शेव चिवडा करंजी चिरोटी बासुंदी
आणखीनही काय काय पदार्थ
स्वतः बनवण्याचा आनंद घ्यावा
लहानपणापासून सर्व आठवणी ताज्या कराव्या
दुकानात जाऊन मऊ कापसा सारखी
आणि अतिशय सुंदर रंगाची लोकर आणावी
सुईवर टाके घेवून मापशिर असं स्वेटर वीणावं
मधेच छान सुबक अशी विण करून
मनासारखं उबदार रुबाबदार स्वेटर वीणावं
ते स्वेटर घालून आत्मविश्वासाने मिरवावे
कुणी विचारताच अभिमानाने म्हणावे,
हो मी विणलंय हे सुंदर उबदार स्वेटर माझ्यासाठी
झाडा फुलांची सवय जोपासावी
हिरवीगार छोटीशी एक बाग असावी
जिथे विविध फुलांची झाडे वेल
फळभाज्या फळे येणारी रोपं असावी
सकाळी उठून बागेतून फुलं तोडावी
नवीन पालवी नवीन कळ्या रंगीत फुले
त्यावर बसणारे छोटे पक्षी पहावे
त्यांचा किलबिलाट ऐकावा
पुढच्या दारासमोर ओट्याच्या भिंतीवर
ज्वारी - बाजरी आणि प्यायला पाणी ठेवता
चिमण्या निरनिराळे पक्षी व खारुताई
त्यांची छोटीशी भुक तहान मिटवायला
रोज न चुकता भेट द्यायला येवून
मनाला एक वेगळाच आनंद समाधान देवून जातात
फक्त स्वतः साठी न जगता
आपल्या स्वकीय आणि आपले
तसेच काही आपुलकीने आणि
ओळखीने कमावलेल्या काही जणांशी
थोडे स्मितहास्य चार शब्द याची देवाण घेवाण व्हावी
हेच तर मनासारखं आयुष्य जगल्याचा आनंद देतात
आपल्या कर्म आणि आजिविकेच्या पलीकडे जाऊन
ह्या लहान - लहान वाटणाऱ्या पण महत्वाच्या
वेळ देवून आणि वेळ काढून केलेल्या गोष्टी
मनाला वेगळाच आनंद उत्साह देवून जातात
दुःख विसरायला मदत करून जगण्याची
नवी उमेद आणि स्फूर्ती देवून जातात.
