वैधव्य (अभंग)
वैधव्य (अभंग)
काय दोष तिचा । नियतीचा घाव ।
तिला कुठे ठाव । वैधव्याचा ।।
पांढ-या पायाची । तिजला वदती ।
दुस्वास करती । जन्मभर ।।
वागणूक पण । न देती समान ।
होउनी अजाण । तीजलागी ।।
किती छळ करी । उठता बसता ।
टोमणे मारता । कष्टी जीणे ।।
नसे सुख जीवा । जीवनात कष्ट ।
जणू सारे नष्ट । जीवनाते ।।
वैधव्याचे जीणे । नकोसे वाटते ।
हृदय चिरते । विचारांती ।।
न रहाता कष्टी । आता लढायाचे ।
नाही सहायाचे । जन्मभर ।।
काळ बदलला । जगू द्या तिलाही ।
मागणे न काही । तिजसाठी ।।