असा मी असामी...
असा मी असामी...
मी कधी सांगितले नाही
तरी काही लपले नाही
उगा जगाचे रितीरिवाज
मी कधी जपले नाही...!
शब्दांची न गरज काही
सारा भार नजर वाही
भावनांचे विश्व सारे
शब्दांना तो अर्थ नाही...!
कालचे कोळून प्यालो
भले बुरे विसरून गेलो
रोज नवीन सूर्योदय
आठवणी ठेवून आलो...!
इथे काय कायम राहते
परिवर्तन होत असते
जिथे विश्वास जन्म घेतो
तेच नाते दृढ होते...!
आले त्यांना सोबत घेवू
रुसले त्यांना सोडून देवू
चार घडीचा संसार सारा
सा-याचा कुठे हिशोब ठेवू...?
जसा आहे तसा आहे
आंतरबाह्य एक आहे
आता का बदल करावा
पैलतीर समीप आहे...!
