अरे पावसा
अरे पावसा
तू दगा देशील म्हणून
वाटलं नव्हतं पण
अंकुर फुटण्याआधीच
तू पसार झाला
आता मरू लागलं
ते हिरवं पीक
तडपून तडपून
तू आला म्हणून
दोन दिवसात
वखरणी करून
पेरणी केली
आणि धावतधुपत
माणसं जमवून
डौरन केलं
जमीन अशी कोरडली
जसा तू आलाच नव्हता
माझ्याच डोळ्यांना
तुझ्या येण्याचा
भास झाला होता
तुझ्या मोहात पडून
पडल्या खांडण्या
लावून घेतल्या पण
तू आला नाही म्हणून
ते बीजही हरवलं
जमिनीच्या कुशीत
कुठे तरी
जन्मलेलं पीक आता
शेवटचा श्वास घेतंय
सोबत माझाही श्वास
थांबतोय हताशेने
सावरून घे त्या पिकाला
आणि तुझ्या या
गरीब शेतकऱ्यालाही...
