अंतरात माझ्या
अंतरात माझ्या
तम दाटून आले आज जरी, कळसावरती क्षितिजाच्या
आवाज तुझा अजूनही निनादे, अंतरात माझ्या
गेलीस जशी तू दूर सरला, आयुष्यातला बहार
साज सोडून एकांती रमला, माझ्या जीवनाचा महाल
प्रतिबिंब तुझे दाविती काचा इथल्या, तुटलेल्या आरशाच्या
आवाज तुझा अजूनही निनादे, अंतरात माझ्या
फुलबाग येथली विरहात तुझ्या, अनामिक गुंतून गेली
आठवणीत तुझ्या रत होऊनी, कळीस विसरून गेली
वेडावून मी सुगंध शोधतो, गर्तेत सावल्यांच्या
आवाज तुझा अजूनही निनादे, अंतरात माझ्या
स्वप्न साजिरे हे माझे, साकारेल एका प्रभाती
येशील तू ही परतून पुन्हा, माझ्या पाऊलवाटी
लपवितो तोवर जगापासूनी, जखमा काळजाच्या
आवाज तुझा अजूनही निनादे, अंतरात माझ्या