अनंताचा प्रवासी
अनंताचा प्रवासी
वाटतं कधी कधी सुरू करावी का परतीच्या प्रवासाची तयारी
जमवलेले सोने,नाणे यांची लावावी का विल्हेवाट
खूप कपडे ,भांडे साठलेले आहेत
कोण करेल त्याची देखभाल
आपण आपल्या समक्ष दान करावे गरीबांत
खूप जडत्व आहे आजूबाजूला
साचून राहिलेलं, चिकटून बसलेलं
हळूहळू मळभ दूर करून
स्वतः करावे आत्मनिरीक्षण.
खूप हलके व्हावेसे वाटते
झटकून सगळे बंध,
पण आपण आपल्याच कर्मात अडकलेलो
बद्ध आहोत चक्रव्यूहात
भेद करणे चक्रव्यूहाचे
खूप कठीण आहे,
कितीही ठरवले परतीच्या प्रवासाचे
तरी सुटत नाही इथले पाश
पण कधी ना कधीतरी निघायचं आहे
तर का धरावी मातीची कास
सोडून द्यावे सगळे नि घ्यावा स्व स्वरूपाचा ध्यास.
