अधिर मन
अधिर मन
रंग प्रीतीचे उधळू चल दोघे मिळून
आले अधिर मन माझे ये तू धावून।।धृ।।
कशा नाचू लागल्यात सरी श्रावणाच्या
तारा कुणी छेडल्यात माझ्या या मनाच्या
ये तुझ्या बाहूत मला घेई तू सामावून।।१।।
सप्तरंगी इंद्रधनू बघ कसा खुणावतो
चन्द्र ढगा आडचा मज जणू बोलावतो
रास खेळू, प्रीत रंगी जाऊया रे रंगून।।२।।
रातराणीचा सुगंध धुंद करतो या मना
येशील कधी सांग माझ्या सख्या साजना
थकले रे डोळे माझे वाट तुझी पाहून।।३।।
मोहविते या मनास हिरवे हिरवे गालीचे
गवत फुलांनी खुलते सौंदर्य वसुंधरेचे
थुई थुई मनमोर नाचे पिसारा फुलवून।।४।।
श्रावणात होते मिलन ऊन पावसाचे
वेध लागले रे तुझ्या माझ्या मिलनाचे
अधिर मनास गंध धुंदी टाकते मोहून।।५।।

