आठवणीतला पाऊस
आठवणीतला पाऊस
आठवणीतला पाऊस
आठवणीतला पाऊस करतो मन ओले चिंब।
ढग भरून बरसता, उमटते सुंदर प्रतिबिंब ॥
आठवणीतला पाऊस असतो , अवखळ, खट्याळ।
तारुण्यातील चंचल पावसाचे, ते विभ्रम लडिवाळ ॥
कधी बरसतो मेघ होऊन, श्यामल कृष्ण सखा।
कधी नाचतो अंगणात , जणू मयूर नृत्य बरखा॥
कधी चमकते सौदामिनी, करते ढगात नर्तन।
पाऊस ओला घेऊन येतो, धुंद आठवण॥
मन- मेघ बरसता, स्मृतींनी रोमांचित हो तनू।
प्रसन्न हृदयावरी उमटते, रंगीत इंद्रधनू॥
वर्षे लोटली किती, त्याची नच उरली नोंद।
आठवणीतला पाऊस आता , नाही देत साद॥
पाऊस आता बरसत नाही, ढगही नाही दाटत।
तारुण्यातले रोमांच आता , नाही मनीं उमटत॥
जीवाची कधी होते काहिली, येता आठवणी दाटून।
काळे ढग मनःपटली जमता, सुखवी पाऊस मनात बरसून॥

